Wednesday, July 29, 2009

भास्कर चंदावरकर यांना संगीत क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली

मैफलीतील संगीत आणि चित्रपटातील संगीत यातील फरक नेमका स्पष्ट करणारा, चित्रपट या माध्यमाची अतिशय सखोल जाण असणारा, तत्त्व आणि प्रात्यक्षिक यांच्यात कलात्मक समतोल साधणारा कलासाधक गमावल्याची भावना पं. भास्कर चंदावरकर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पं. चंदावरकर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत १९६८ ते १९८० या काळात संगीत विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि संगीतकार या नात्याने काम केले होते. चंदावरकर यांच्या आठवणी जागविणाऱ्या या श्रद्धांजली सभेत त्यांच्यासोबत वावरलेले त्यांचे मित्र गहिवरले होते.
ज्येष्ठ चित्रपटतज्ज्ञ पी. के. नायर म्हणाले, ""चंदावरकर यांच्यातील कलागुणांचा दर्जा दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या लक्षात येताच त्यांनी चंदावरकरांना संस्थेत येण्यास सुचवले, पण "नोकरी' स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. कालांतराने ते संस्थेत रुजू झाले. १९६८ मध्ये संस्थेच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभाची "सिग्नेचर ट्यून' करण्याचे काम राहिले होते. तेव्हा पंडित रविशंकर संस्थेत आले होते. रवीजी आणि भास्करजी यांनी रात्रभर जागून ही ट्यून तयार केली होती. ती नंतर एका चित्रपटातही वापरली गेली होती. मूकपटांच्या काळात वाजविले जाणारे लाइव्ह संगीत हा चंदावरकरांच्या संशोधनाचा एक भाग होता. "कालियामर्दन' या मूकपटासाठी वाजवलेले संगीत त्यांनी नंतर स्वतः तयार केले होते. सध्या संस्थेच्या चित्रपटगृहाची ग्रीनरूम असणारी खोली त्या काळी "म्युझिक रूम' होती आणि ते रात्र रात्र जागून तिथे संगीतरचनांचे काम करत असत. चंदावरकर, मी आणि सुरेश छाब्रिया चित्रपट या माध्यमाविषयी तिथे सतत चर्चा, वादविवाद करत असू,'' अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
सुरेश छाब्रिया म्हणाले, ""आधुनिकतावाद, आधुनिक संगीत, चित्रकला, तत्त्वज्ञान यांच्या समकालीन प्रवाहांची अत्यंत प्रगल्भ जाण हे चंदावरकर यांचे वैशिष्ट्य होते. संगीत हा त्यांचा ध्यास होता. पण अन्य कलांविषयी ते सतत सजग असत. "एफटीआयआय'मुळे आमचा दीर्घकाळ संबंध आला. चित्रपटातील संगीत आणि मैफलीतील संगीताविष्कार यांतील फरक त्यांनी नेमका पकडला होता. कुठल्या माध्यमासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती संगीत असावे, याचा त्यांचा अभ्यास विलक्षण होता.''
सतीश आळेकर म्हणाले, ""आमचे संबंध "एफटीआयआय'च्या स्थापनेपासूनचे होते. संस्थेच्या "चित्रपट रसग्रहण वर्गा'चा मी विद्यार्थीही होतो. साहित्य, संगीत, चित्रपट याविषयीच्या त्यांच्या चर्चा, वाद त्यांचे परस्परसंबंध याविषयी ते सतत सांगत असत. त्या काळात इंटरनेट नव्हते, पण चंदावरकर म्हणजे आमचा "विश्‍वकोश'च होता. समकालीन संवेदना घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. "घाशीराम कोतवाल' नाटकाच्या मूळ संहितेत इतकी गाणी नव्हती. चंदावरकरांनी ती स्वतः तयार केली आणि संगीतापलीकडचेही योगदान दिले.''
श्‍यामला वनारसे म्हणाल्या, ""ज्या पद्धतीने चंदावरकर काम करत असत, ती पद्धतच विद्यार्थ्यांना खूप शिकवणारी असायची. सूर, लय, ताल, चित्र, रंग यांच्यातील सूक्ष्म पण तरल नाती ते विद्यार्थ्यांसमोर उलगडत असत.'' रवी कुलकर्णी, श्रीमती छाब्रिया, लक्ष्मी बिराजदार, जयश्री बोकील यांनीही आदरांजली अर्पण केली.