Sunday, May 2, 2010

आनंद भाटे सादर करणार तीन दिग्गजांचे अभंग

नटसम्राट बालगंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले अभंग आता किराणा घराण्याचे युवा गायक आनंद भाटे यांच्या स्वरांतून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रविवारी (ता. 2) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता भाटे यांच्या अभंग गायनाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

या कार्यक्रमात भाटे यांना राजीव परांजपे (ऑर्गन), प्रसाद जोशी (तबला), नंदू भांडवलकर (पखवाज) साथ करणार आहेत, तर माउली टाकळकर टाळवादनाने या अभंगगायनामध्ये रंग भरला जाणार आहे. लहानपणीच आपल्या मधुर गायनाने 'आनंद गंधर्व' हा किताब पटकाविलेला नूमवि प्रशालेचा विद्यार्थी आनंद भाटे यांनी पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1988 पासून पं. भीमसेन जोशी यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून त्यांना नाट्यगीतांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कार्यक्रमाविषयी भाटे म्हणाले, 'पं. भीमसेनजी या माझ्या गुरुजींची "संतवाणी' मी ऐकली आहे. या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या अलौकिक स्वरांनी उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्या पातळीपर्यंत पोचण्यास मला किती जन्म लागतील देव जाणे; पण त्यांच्याकडून जे शिकता आले ते लोकांपर्यंत सादर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या अभंगगायनाच्या माध्यमातून भक्तिभाव हा नकळतपणे शास्त्रीय गायन न कळणाऱ्यांपर्यंत पोचतो. "जय जय राम कृष्ण हरी' या गजरापासून सुरवात करून या तीन दिग्गजांचे अभंग सादर करणार आहे. एखादे हिंदी किंवा कानडी भजनदेखील सादर करण्याचा मानस आहे.