Wednesday, August 24, 2011

उस्ताद अजीजुद्दिन खाँ यांचे निधन


हिंदुस्तानी ख्याल गायकीच्या जयपूर-अतरौली घराण्याचे खलिफा उस्ताद अल्लादिया खाँ यांचे नातू उस्ताद अजीजुद्दिन खाँ (उर्फ बाबा) यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते उस्ताद भुजीर् खान (अल्लादिया खाँ यांचे धाकटे चिरंजीव) यांचे सुपुत्र होते.

७ फेब्रुवारी १९२१ रोजी जन्मलेल्या बाबांनी पिता व आजोबांकडून अनेक दुर्लभ रागातील बंदिशांची तालीम घेतली होती. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात अल्लादिया खाँ यांनी आपले जीवन चरित्र लिहून घेतले होते. त्याचा मराठी अनुवाद पं. गोविंदराव टेंबे यांनी केला व इंग्रजीत ते 'माय लाइफ' या शीर्षकाने उपलब्ध आहे. उस्ताद अजीजुद्दिन खान यांना उच्च रक्तदाबामुळे मैफिली गायक होता आले नाही. पण आपल्या जवळील विद्या त्यांनी अखेरपर्यंत मुक्तहस्ते दिली. बाबा खाँसाहेबांनी स्वत: नवे राग व बंदिशींची रचना केली. त्यांच्याकडून किशोरी आमोणकर, धोंडुताई कुलकणीर्, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, श्रुती सडोलीकर-काटकर, पं. जितेंद अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे आदींनी विद्या ग्रहण केली होती. साधी जीवनशैली, निस्पृहता, शीघ्र कवित्व, स्वाभिमान अशा गुणांनी युक्त असे बाबा खाँसाहेबांचे जीवन होते.