Wednesday, January 8, 2014

Vasantotsav 2014


पुणे - छत्तीसगडमधील 'पांडवनी' कलेच्या वारसदार तीजनबाई यांचे महाभारतावर आधारित कथानाट्य... कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन... सतारवादक निलाद्री कुमार आणि तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांचे सादरीकरण हे यंदाच्या "वसंतोत्सव' संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. हा महोत्सव 17 ते 19 जानेवारीदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग मैदान येथे आयोजिला आहे. यात कथक नृत्यांगना रोशन दाते आणि संगीततज्ज्ञ दीपकराजा यांना "वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान' प्रदान करण्यात येणार आहे. "सकाळ' या कार्यक्रमाचा सहयोगी प्रायोजक आहे. 


 
प्रख्यात गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा महोत्सव सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळात होईल. संगीतातील विविध प्रवाहांचा मिलाफ रसिकांना या निमित्ताने अनुभवता येणार आहे, अशी माहिती डॉ. देशपांडे यांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये रोख, असे सन्मानाचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे महोत्सवात युवा शास्त्रीय गायक लतेश पिंपळखरे यांना "वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार' म्हणून गौरविण्यात येईल. 

महोत्सवात पहिल्या दिवशी (ता. 17) तीजनबाई या संगीताच्या साथीने महाभारतातील कथानाट्य सादर करतील. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे गायन होईल. 

दुसऱ्या दिवशी (ता. 18) कौशिकी चक्रवर्ती आणि तबलावादक विजय घाटे यांच्या कलेचे सादरीकरण होणार असून, सतारवादक निलाद्री कुमार आणि तबलावादक पं. अनिंदो चटर्जी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. 

'वसंतोत्सवा'च्या शेवटच्या दिवशी (ता. 19) ग्रॅमी पुरस्कार विजेते विक्‍कू विनायक यांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. घटमच्या साह्याने ते कर्नाटकी संगीतातील विविध पैलू उलगडणार आहेत. अभिजित पोहनकर, स्वप्नील बांदोडकर आणि राहुल देशपांडे या तीन युवा कलाकारांच्या उत्कंठावर्धक अदाकारीने महोत्सवाची सांगता होणार आहे. 

सीझन तिकीट उपलब्ध... तिघांसाठी सोफा : पाच हजार रुपये 
खुर्ची : 600 रुपये 
भारतीय बैठक : 200 रुपये 
तिकीट विक्रीचे स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, शिरीष ट्रेडर्स येथे 8 जानेवारीपासून.